कल्याण-डोंबिवलीत सहा रुग्ण वाढले

कल्याण-डोंबिवलीमध्ये करोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला असून यातील एका महिलेचा मृत्यू झाल्याने शहरांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सोमवारी कल्याणमध्ये दोन तर डोंबिवलीत चार नवे रुग्ण आढळल्याने कल्याण-डोंबिवलीमधील करोनाबाधितांची संख्या ३४ झाली आहे. यातील सहा रुग्णांवर उपचार झाल्याने ते करोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

डोंबिवलीत करोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच डोंबिवलीतील एका करोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कल्याण-डोंबिवलीकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पालिकेच्या आरोग्य विभागासमोर करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. त्यातच सोमवारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सहा नवीन रुग्‍ण आढळून आले, यामुळे महापालिका क्षेत्रात करोनाबाधित रुग्‍णसंख्‍या आतापर्यंत ३४ झाली आहे.

कल्याण पूर्व सहा, कल्‍याण पश्चिम सात, डोंबिवली पूर्व १६, डोंबिवली पश्चिम सहा असे रुग्ण आढळले असून डोंबिवली पूर्वेला करोनाचा झपाट्याने फैलाव होत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी आढळलेल्या नवीन रुग्णांमध्ये डोंबिवली पश्चिमेकडे राहणाऱ्या जसलोक रुग्णालयाच्या परिचारिकेचा समावेश आहे तर उर्वरित रुग्ण करोनाबधित रुग्णांच्या संपर्कात आले आहेत.