१४ तारखेनंतर लोक घरात राहण्याच्या मनस्थितीत नाहीत

अनेक लोक १४ एप्रिलनंतर घरात राहण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळं जिथं करोनाचे रुग्ण नाहीत, अशा भागातील लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील करावा असं माझं मत आहे. मात्र, याबबातचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील,' असं राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज सांगितलं.


नगर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले मुश्रीफ आज करोनामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी लॉकडाऊनबाबत त्यांचं मत व्यक्त केलं. '१४ एप्रिलनंतर लॉकडाऊन काही प्रमाणात शिथील करावं, असं माझं वैयक्तिक मत आहे. मात्र, ज्या गावातील लॉकडाऊन शिथिल केला जाईल, त्या गावात इतरांना प्रवेश मिळता कामा नये. त्यासाठी त्या गावाच्या सीमा १०० टक्के बंद केल्या जायला हव्यात. आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या मंत्रिमंडाळाच्या बैठकीत मी सहभागी होणार आहे. बैठकीमध्ये लॉकडाउनबाबत माझे मत मांडणार आहे. लॉकडाऊन उठावं असं अनेकांचं मत असल्याचं मी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देईन, असं मुश्रीफ म्हणाले.