परभणी : येथील जुना मोंढा भागातील दिलकश हॉटेलमध्ये कलम ३०४ च्या प्रकरणात कारागृहातून जमीनावर बाहेर आलेल्या आरोपीचा दिवसाढवळ्या खून झाल्याने खळबळ उडाली आहे. तोंडाला रुमाल बांधून आलेला मारेकरी मात्र पोलिसांनी अवघ्या चार तासात जेरबंद केला.
शेख हमीद शेख हुसेन (रा. मराठवाडा प्लॉट, परभणी) असे या खून झालेल्या आरोपीचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी त्याच्यावर कलम ३०४ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तीन दिवसांपूर्वी त्याला या प्रकरणात जामीन मिळाली होती. तो बाहेर आल्यानंतर शनिवारी (१४ मार्च) सकाळी १२ वाजेच्या दरम्यान त्याच्यासोबत हा प्रकार घडला. जुना मोंढा भागात असलेल्या दिलकश या हॉटेलमध्ये हुसेन हा बसलेला होता. त्यावेळी तोंडावर रुमाल बांधलेल्या इसमाने तेथे येऊन त्याच्यावर चाकूचे वार केले. घटनेनंतर लगेच हुसेन याला परभणीच्या शासकीय रुग्णालयांमध्ये नेण्यात आले. परंतु, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने वाटेतच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तर आरोपीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. दरम्यान, मारेकरी विजय बाबासाहेब वाकळे याचा पोलिसांनी अवघ्या चार तासात शोध घेऊन त्याला जेरबंद केले आहे. दरम्यान, वाकळे हा मराठवाडा प्लॉट येथील रहिवासी आहे. जुन्या एका गुन्ह्यातील वादातून त्याने शेख हमीद शेख हुसेन याला संपवल्याचे सांगण्यात येते.